आईला नोकरीवर ठेवावं म्हणून आईला देतायेत पाठिंबा

 आमगाव नगरपरिषदेपुढे महिलेचं चिमुकल्यांसह आमरण उपोषण – न्यायाच्या प्रतीक्षेत दुर्गा कटरे यांचा संघर्ष



गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुर्गा कटरे नावाची कंत्राटी महिला कर्मचारी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना सोबत घेऊन न्यायासाठी आमरण उपोषणाला बसली आहे. ‘पुन्हा नोकरी मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, जीव गेला तरी चालेल’ असा निर्धार तिने केला आहे.

दुर्गा कटरे यांची ३० सप्टेंबर २०२१ रोजी आमगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात कंत्राटी तत्वावर कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेली दोन वर्षे त्या प्रामाणिकपणे सेवा देत होत्या. मात्र, अचानकपणे प्रशासनाने त्यांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी केले. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दुर्गा कटरे यांना आपला संसार आणि दोन मुलींचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे.

न्यायाच्या शोधात, आणि पुन्हा कामावर घेण्याची मागणी करत दुर्गा कटरे यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आमगाव नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या ठिकाणी त्यांना कुठलाही मंडप, पाणी किंवा सुविधा उपलब्ध नाहीत. कडक उन्हातही त्या आपल्या मुलींना घेऊन आपला हक्क मागण्यासाठी बसल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या दोन चिमुकल्या मुली या उपोषणात आईच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणाले, “दुर्गा कटरे यांची नेमणूक कंत्राटी होती आणि त्यांचं काम समाधानकारक नव्हतं, म्हणून त्यांना कमी केलं.” मात्र, ही प्रतिक्रिया असंवेदनशील आणि टाळाटाळ करणारी असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

दुर्गा कटरे यांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे घर नाही, आणि घरात कमावणारा कोणी नाही. अशा परिस्थितीत कामावरून कमी होणे हे केवळ अन्यायकारकच नव्हे तर अमानवी आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र होईल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णपणे नगरपरिषदेची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता पहावं लागेल की, दोन चिमुकल्यांसह आईचा आक्रोश प्रशासनाच्या कानावर कधी पडतो आणि तिला न्याय कधी मिळतो. हा लढा केवळ एका महिलेचा नाही, तर सामान्य कामगारांच्या हक्कांचा आणि अस्तित्वाच्या लढ्याचं प्रतीक बनला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post