स्वच्छतेकडे दुर्लक्ष उघड! आमगांव बसस्थानकाच्या पाहणीत उघडल्या धक्कादायक त्रुटी
आमगांव, ८ मे २०२५ – "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान – २०२५" अंतर्गत आमगांव बसस्थानकावर पार पडलेल्या प्रथम टप्प्यातील पाहणीत धक्कादायक त्रुटी उघड झाल्या आहेत. विशेषतः सार्वजनिक प्रसाधनगृहाची दयनिय व दुर्गंधीयुक्त अवस्था चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.
या पाहणीसाठी चंद्रपूर विभागीय समितीच्या अध्यक्षा सौ. रोहिणी पुन्नमवार, सचिव सौ. प्रांजली थोटे, पत्रकार रितेश अग्रवाल आणि प्रवासी प्रतिनिधी धनराज भगत यांनी बसस्थानकाची तपासणी केली. त्यांनी स्वच्छता, सुविधा आणि प्रवासी व्यवस्थापन यावर आधारित निरीक्षण नोंदवले.
पाहणीत काही भागांत समाधानकारक स्वच्छता आढळून आली, मात्र प्रसाधनगृहाची अत्यंत वाईट स्थिती ही गंभीर बाब म्हणून अधोरेखित करण्यात आली. प्रवाशांच्या गैरसोयीमुळे समितीने ही बाब गांभीर्याने घेतली असून, लवकरच यावर उपाययोजना अपेक्षित आहे.
या निरीक्षणावेळी परिवहन विभागाचे कामगार अधिकारी पराग शंभरकर आणि वाहतूक नियंत्रक शामलाल मेश्राम हे उपस्थित होते. त्यांनीही तत्काळ स्वच्छता मोहिम हाती घेण्याची गरज व्यक्त केली.
विभागीय समितीने पाहणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे ठरवले असून, या अहवालाच्या आधारे सुधारणा व अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
स्वच्छ भारत अभियान हे केवळ घोषणांपुरते न राहता, प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या अनुभवात उतरत असल्याचे वास्तव अधोरेखित करणारी ही पाहणी ठरली. प्रशासनाने याकडे गंभीर दृष्टीने पाहून तातडीने ठोस पावले उचलावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.