भंडाऱ्यात वाळू माफियांची मुजोरी; नायब तहसीलदार व पोलीस पाटलाला धक्काबुक्की
भंडारा :भंडाऱ्यात वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. मोहाडी तालुक्यातील खमारी गावात वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार आणि गावाचे पोलीस पाटील कुवरलाल दमाहे यांना वाळू माफियांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार रविवारी सकाळी घडला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खमारी गावाजवळील नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची खबर प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर मोहाडीचे नायब तहसीलदार आणि पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले. तेव्हा वाळू माफियांनी वाद घालत अधिकार्यांशी धक्काबुक्की केली आणि वाळू रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर घेऊन पसार झाले.
घटनेनंतर गावकऱ्यांनीही संताप व्यक्त करत वाळू माफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. ग्रामस्थांनी नायब तहसीलदार व पोलीस पाटलांना घेराव घालून अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची विनंती केली.
या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात वाढत्या वाळू तस्करीच्या घटनांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.