जनतेच्या हक्कासाठी पत्रकारांचा पुढाकार – नगर परिषदेला इशारा!


गरजूंना न्याय मिळावा म्हणून पत्रकार संघ आक्रमक!

घरकुल, रस्ते, नाल्यांचे प्रश्न मार्गी लावा – नगर परिषदेला ठणकावून निवेदन



आमगाव  – “जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही,” असा ठाम इशारा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संलग्न महाराष्ट्र पत्रकार संघ, तालुका आमगावच्या वतीने दिनांक २ मे रोजी आमगाव नगर परिषदेला घरकुल, रस्ते सिमेंटिकरण, नाल्यांचे बांधकाम व विहिरींच्या स्वच्छतेसाठी ठोस निवेदन सादर करण्यात आले.

मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या या निवेदनात अनेक गंभीर प्रश्नांचा उल्लेख करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करण्यात आले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष जितेन्द्र पटले, सचिव सचिन श्यामकुंवर, राज्य संपर्क प्रमुख भोला गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष डी. के. भगत यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात सांगण्यात आले की, नगर परिषद हद्दीत ५,००० हून अधिक गरजू नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्ज सादर केले आहेत, मात्र त्यातील बहुतांश अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. काहींना मंजुरी मिळाली असली तरी देखील निधी अपुर्या प्रमाणात वितरित केला गेला असून त्यामुळे त्यांची घरे अपूर्ण अवस्थेत अडकून पडली आहेत. ही बाब गंभीर असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व पात्र अर्जदारांना त्वरित मंजुरी व निधी द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

याशिवाय, नगर परिषदेच्या अनेक प्रभागांमध्ये आजही मुरूम व खडीचे रस्ते आहेत. पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय होत असल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत होते. त्यामुळे रस्त्यांचे सिमेंटिकरण करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच, नाल्यांची उभारणी न झाल्यामुळे सांडपाण्याचा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात रोगराईचा धोका निर्माण होत आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

एकीकडे नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेकडून सार्वजनिक विहिरींची नियमित स्वच्छता व दुरुस्ती केली जात नसल्याने वर्षानुवर्षे विहिरींमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आजारांचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती कायम राहिल्यास गंभीर आरोग्य संकट ओढवण्याची शक्यता असून तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पत्रकार संघाने केली.

या निवेदन प्रसंगी सुमित ठाकरे, नरेन्द्र निखारे, नरेश बोपचे, व्ही.डी. मेश्राम, मनोज भालाधरे, राकेश रामटेके, तामेश्वर पधरे हेमंत शर्मा, राजेश मानकर, संजू खोटेले, सरोज कावळे, हरिहर पाथोडे आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

"जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही रस्त्यावर उतरून जनतेसह आंदोलन छेडू," असा ठाम इशारा पत्रकार संघाने दिला आहे. गरजूंना न्याय मिळावा, नागरी सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासनाने जनतेच्या हितासाठी जागे व्हावे, यासाठी पत्रकार संघाने घेतलेली भूमिका निश्चितच स्तुत्य आहे.


Post a Comment

Previous Post Next Post