थंड पाण्याच्या मटक्यांचे वाटप : नमस्ते नाशिक फाउंडेशनचा समाजोपयोगी उपक्रम
नाशिक : "आपल्या थोड्याशा सहकार्याने कोणाची तरी तहान भागेल" या प्रेरणादायी विचारातून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून उन्हाळ्यात गरजूंकरिता थंड पिण्याच्या पाण्याचे मटके दान करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दान करून पुण्य कमवा या उपक्रमांतर्गत "थंड पाण्याचा मटका" हे सामाजिक व धार्मिक कार्य म्हणून राबविण्यात आले.
या अंतर्गत जलालपूर या छोट्याशा गावातील निराधार, गरजू व शेतमजूर कुटुंबांना थंड पाण्याचे मटके भेट म्हणून देण्यात आले. मटका मिळाल्याचा आनंद आणि समाधान गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. याच समाधानाची प्रचिती नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या सदस्यांनाही जाणवली.
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम एक प्रकारचे वरदान ठरला आहे. या उपक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वाटप सोहळ्याच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष स्नेहल देव, अनिल नहार, जलालपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ बडदे, संस्थेचे खजिनदार संदीप देव व इतर मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक जाणिवेतून साकार झालेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे समाजात मदतीचा आणि सहकार्याचा भाव जागविण्यात यश मिळाले आहे.