सरपंच आरक्षण सोडतीसाठी २४ एप्रिलला आमगावमध्ये महत्त्वपूर्ण सभा
तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आमगाव यांचे आवाहन
आमगाव (AMGAON )– गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय आमगाव येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. याबाबत तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, आमगाव यांनी सर्व ग्रामसेवकांमार्फत ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन केले आहे.
आमगाव तालुक्यात एकूण ५७ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण आरक्षण सोडतीसाठी सर्व संबंधितांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीतील नेतृत्व ठरवणारी ही आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार राबवली जाणार असून, यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती तहसील प्रशासनाने केली आहे.
"आरक्षण सोडत ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा गैरसमज राहू नये यासाठी पूर्ण पारदर्शकतेने कार्यवाही करण्यात येईल. सर्व ग्रामसेवक व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, हाच आमचा आग्रह आहे."
- सतीश वेलाडी आमगाव तालुका निवडणूक अधिकारी
सदर प्रक्रिया ही प्राथमिकतेने हाताळण्यात येणार असल्यामुळे सर्व ग्रामसेवकांनी आपल्या अधिनस्त सदस्यांना वेळेत माहिती देऊन त्यांना उपस्थित राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.आरक्षण प्रक्रियेला आवश्यक ती गांभीर्याने घेण्याचे आवाहन सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधींना केले आहे.